बौद्ध संस्कृती मध्ये अशोकाची जयंती ६०० वर्षांनंतर बोधिसत्व म्हणून मोठ्या प्रमाणात साजरी केली जात होती याची नोंद इतिहासात आहे.
फाहियान इ. स ४०० मध्ये आलेला चिनी प्रवासी या उत्सवाची नोंद करतो -
"सर्व मध्यदेशात पाटलीपुत्र सर्वात मोठे शहर आहे. येथील लोक श्रीमंत आणि सुखी आहेत. सत्कृत्ये करण्यात ते एकमेकांशी स्पर्धा करतात. प्रत्येक वर्षी दुसऱ्या महिन्याच्या आठव्या दिवशी ते रथ यात्रा काढतात. त्यासाठी ते चार चाकाच्या रथाचा उपयोग करतात. त्या रथावर बांबूच्या सहाय्याने पाच मजली बांधकाम केले जाते तेव्हा त्या रथाचा आकार पॅगोडा सारखा दिसू लागतो. तो रथ साधारण उंचीने वीस फूट असतो. त्याच्यावर पांढरा लोकरीचा कपडा चढविला जातो. अनेक बौद्ध देवदेवतांची चित्रे त्यावर काढली जातात. सोने चांदी आणि रेशमी झालरीने तो सुशोभित केला जातो. रथाच्या चारही बाजूना बोधिसत्व सह आसनस्थ बुद्धाची बुद्धरूपे ठेवली जातात. अशा तर्हेने साधारणपणे वीस रथ तयार केले जातात. प्रत्येक रथाचे आपापले वैशिष्ट्ये असते. रथयात्रे च्या दिवशी भिक्कु आणि उपासक जमतात. उपासकातील काही उपासक गाणे गाण्यासाठी, वाद्ये वाजवण्यासाठी आणि नृत्ये करण्यासाठी आलेली असतात. शहरात बुद्धाच्या मूर्तीचे स्वागत करण्यासाठी ब्राह्मण पुढे येतात. मग शहरभर यात्रा फिरते. रात्रभर मशाली जळत असतात आणि रात्रभर पूजा चाललेली असते. सर्व बौद्ध देशांमध्ये अशाच प्रकारच्या रथयात्रेचा उत्सव साजरा केला जातो. ह्या देशाच्या श्रेष्ठींनी आणि उपासकांनी शहरात धर्मादाय दवाखाने उघडले आहेत तेथे सर्व गरीब, निराधार, व व्यंग असलेले लोक जाऊ शकतात. येथे त्यांच्या सर्व गरजा पुरवल्या जातात. कोणते अन्न खावयाचे आणि कोणते औषध द्यायचे ते वैद्य सांगतात. बरे झाल्यावर ते दवाखाण्यातून घरी जाऊ शकतात"
सम्राट अशोक त्याच्या कार्यामुळे बोधिसत्व पदापर्यंत पोहचला होता. हा उत्सव मगधाची राजधानी पाटलीपुत्र मधील आहे. उत्सवाची तिथी ही दुसऱ्या महिन्याची अष्टमी दिली आहे. आता बर्याच लोकांना वाटेल पहिला महिना चैत्र तर दुसरा महिना वैशाख आहे. मग ही बुद्ध जयंतीचीच रथयात्रा असू शकेल पण मुळातच बुद्ध जयंती अष्टमीला होत नाही पौर्णिमेला होते. वैशाख कृष्ण अष्टमी चंद्रगुप्त मौर्य यांचा जन्म दिवस असला तरी त्यांना बोधिसत्व म्हणण्याचं कारण नाही कारण ते बौद्ध धर्मीय नव्हते. बौद्ध धर्मामध्ये त्यांना फारस म्हणजे अशोका इतकं महत्व नाही.
केतकर यांच्या ज्ञानकोशातील संदर्भावरून या गोष्टीची अडचण सुटते. केतकर ज्ञानकोश मध्ये असे म्हटलेलं आहे की - ' जुन्या पंचांग पद्धतीचा लक्षपूर्वक अभ्यास केला असता असे दिसून येईल की जरी शक आरंभ निरनिराळ्या काळी निरनिराळ्या दिवसांपासून केला होता तरी वर्षारंभ नेहमी फाल्गुन शुद्ध प्रतिपदेसच होत असे.
केतकर ज्ञान कोशातून हे स्पष्ट झालंय की पूर्वी वर्षांची सुरवात फाल्गुन महिन्यात सुरू होत होती. आणि त्यामुळे फाहियान याने वर्षाचा दुसरा महिना व अष्टमी जे म्हटलं आहे ते चैत्र शुक्ल अष्टमी या तिथीला म्हटलं आहे. या दिवशी हिंदू धर्मात दुर्गाष्टमी व अशोकष्टमी असते.
वासुदेव गोविंद आपटे यांनी लिहिलेल्या अशोक चरित्रामध्ये अशोकाचे जन्मनक्षत्र पुनर्वसु नक्षत्र आहे असे म्हटलेलं आहे. हे पुनर्वसु नक्षत्र चैत्र शुक्ल अष्टमी, दुर्गाष्टमी, अशोकाष्टमी या दिवशी येते.
उत्तरविहारठ्ठकथा मधील माहिती -
उत्तरविहारठ्ठ कथा हा ग्रंथ अशोकाचा मुलगा महिंद्र यांचा आहे. हा ग्रंथ म्यानमार या देशात सापडला असून सिद्धार्थ वर्धन सिंह यांनी त्याच प्रकाशन व भाषांतर केले आहे. या ग्रंथात सम्राट अशोक यांच्या जन्माविषयी पुढील माहिती मिळते.
"चेत्तमासे सुक्क-अट्ठमी दिवसे उपाजित्वा,
यस्सेसो दुल्लभो लोकों पातुभावो अभिण्हसो |
असोको आसि तेसं पुञ्ञतेजबलोद्धिको ||"
_________________ (उत्तरविहारट्ठकथायं-थेर महिन्द)
चैत्र मास की शुक्ल पक्ष की अष्टमी को उत्पन्न होकर जिनका संसार मे प्रादुर्भाव होना सदा दुर्लभ है जिनमे अशोक पुण्य तेज बल रिद्धी संपन्न है
अर्थात या ग्रंथावरून हे उघड झाले की चैत्र शुक्ल अष्टमी ला सम्राट अशोकाचा जन्म झाला. व याच चैत्र शुक्ल अष्टमी ला अशोकाची मोठ्या प्रमाणात जयंती देशभर साजरी होत होती असे फाहियान याच्या प्रवासवर्णन वरून मिळते
उत्तरविहारठ्ठ मध्ये आणखी काही महत्वाची माहिती मिळते या ग्रंथा मध्ये वैशाख कृष्ण अष्टमी या दिवशी सम्राट चंद्रगुप्त यांचा जन्म झाला अशी माहिती मिळते. त्याच बरोबर कार्तिक पौर्णिमेला सम्राट अशोक यांचं महापरिनिर्वाण झालं अशीही माहिती हा ग्रंथ देतो. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कौटिल्य याच मूळ नाव विष्णुगुप्त आहे. तो विष्णुगुप्त सम्राट चंद्रगुप्ताचा गुरू असला तरी तो त्याचा भाऊ होता अशी महत्वपूर्ण माहिती हा ग्रंथ देतो.
या माहितीमुळे इतिहासातील बरेच प्रश्न व वाद मिटले जाण्याची शक्यता आहे.
२०१४ पर्यंत अशोकाच्या जन्म तिथी चा कोणताच पुरावा आपल्याकडे नव्हता. २०१४ साली प्रथम बिहार सरकारने अशोक जयंती चैत्र शुक्ल अष्टमी या दिवशी साजरी केली. तेव्हाच हे पुरावे शोधले गेले असावेत. आता ह्या पुराव्यामुळे पुन्हा मोठ्या प्रमाणात अशोक जयंती देशभरात साजरी होईल अशी आशा वाटते.
संदर्भ-
१) उत्तरविहारठ्ठकथाय - थेर महिंद (संपादक - सिद्धार्थ वर्धन सिंह)
२) केतकर ज्ञान कोष
३) तीन चिनी प्रवासी - मा. शं. मोरे
४) the real birth place of buddha - chakradhar mohapatra
५) अशोक चरित्र - वासुदेव गोविंद आपटे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा