इतिहास लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
इतिहास लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ७ मार्च, २०२२

महामाया महिषासुरमर्दिनी

सिंधू संस्कृतीत भूमातेला रेडा बळी देण्याची प्रथा

 
रुक्मिणी मंदिरातील बुद्धमूर्ती

नालंदा जवळील जगदिशपूर येथील भूमीस्पर्श बुद्ध मूर्ती चा खालचा भाग. ज्याच्या खालच्या डाव्या सेक्शन मध्ये कोपऱ्यात मार बुद्धाना मारताना दाखवला आहे. बाजूच्याच दुसऱ्या सेक्शन मध्ये दोन कथा दाखवणाऱ्या घटना आहेत. पहिली घटना बुद्ध जन्माची आहे. मायेला प्रसूती वेदना झाल्यानंतर ती एका वृक्षाच्या फांदीला पकडतेय असा भास व बाजूला तिच्या सहकारी प्रसूती कळा होत असताना तिला सांभाळताना. त्याच सेक्शनमध्ये बाजूला मायेचं महिषासुरमर्दिनी रूप. सिंधू संस्कृती काळापासून भूमातेच्या प्रसवण्याच्या उत्सवात रेडा बळी दिला जात असे. सिंधू संस्कृतीत ती देवी कोणत्या गणाची होती हे ज्ञात नाही. पण प्रत्येक गणात एक अशी भूमाता मानली गेली व तिला असा बळी दिला गेला. हिंदू धर्मानुसार माया अश्विन शुद्ध दशमीला म्हणजे दसर्याला प्रसूत झाली व तिने बुद्धाला जन्म दिला. त्यावेळच्या परंपरेप्रामाणे कोली शाक्य गणाची भूमाता म्हणून तिला रेड्याचा बळी दिला गेला. तीच प्रथा आजही काही ठिकाणी दसर्याला रेडा बळी देऊन केली जाते. महिषासुर व महिषासुरमर्दिनी हिंदू धर्मात अश्या प्रकारे प्रकट झाले आहेत



सोमवार, २१ फेब्रुवारी, २०२२

सम्राट अशोकांची जन्मतिथी कोणती ?

 


देशाच्या राष्ट्रीय प्रतिकांमध्ये जरी अशोकाचा योग्य सन्मान झाला असला तरी उघडपणे आज अशोकाची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी होत नाही. हिंदू संस्कृतीत अशोकाचा जन्म दिवस अशोक अष्टमी म्हणून ओळखली गेली असली तरी सम्राट अशोकाच मनुष्यरूपातील विस्मरण त्यात झालेलं आहे. अशोकाच्या वृक्षाची पूजा किंवा दुर्गेची अशोक फुलाने केलेली पूजा (दुर्गेचा जन्म चैत्र शुक्ल अष्टमी ला झाला असं मानलं जातं) अस स्वरूप त्याला लागलेलं आहे.   दुर्गेच वाहन सिंह व अशोकाच कुल चिन्ह सुद्धा सिंह हा एक आश्चर्यकारक योगायोग आहे.


बौद्ध संस्कृती मध्ये अशोकाची जयंती ६०० वर्षांनंतर बोधिसत्व म्हणून मोठ्या प्रमाणात साजरी केली जात होती याची नोंद इतिहासात आहे.

फाहियान इ. स ४०० मध्ये आलेला चिनी प्रवासी या उत्सवाची नोंद करतो -

"सर्व मध्यदेशात पाटलीपुत्र सर्वात मोठे शहर आहे. येथील लोक श्रीमंत आणि सुखी आहेत. सत्कृत्ये करण्यात ते एकमेकांशी स्पर्धा करतात. प्रत्येक वर्षी दुसऱ्या महिन्याच्या आठव्या दिवशी ते रथ यात्रा काढतात. त्यासाठी ते चार चाकाच्या रथाचा उपयोग करतात. त्या रथावर बांबूच्या सहाय्याने पाच मजली बांधकाम केले जाते तेव्हा त्या रथाचा आकार पॅगोडा सारखा दिसू लागतो. तो रथ साधारण उंचीने वीस फूट असतो. त्याच्यावर पांढरा लोकरीचा कपडा चढविला जातो. अनेक बौद्ध देवदेवतांची चित्रे त्यावर काढली जातात. सोने चांदी आणि रेशमी झालरीने तो सुशोभित केला जातो. रथाच्या चारही बाजूना बोधिसत्व सह आसनस्थ बुद्धाची बुद्धरूपे ठेवली जातात. अशा तर्हेने साधारणपणे वीस रथ तयार केले जातात. प्रत्येक रथाचे आपापले वैशिष्ट्ये असते. रथयात्रे च्या दिवशी भिक्कु आणि उपासक जमतात. उपासकातील काही उपासक गाणे गाण्यासाठी, वाद्ये वाजवण्यासाठी आणि नृत्ये करण्यासाठी आलेली असतात. शहरात बुद्धाच्या मूर्तीचे स्वागत करण्यासाठी ब्राह्मण पुढे येतात. मग शहरभर यात्रा फिरते. रात्रभर मशाली जळत असतात आणि रात्रभर पूजा चाललेली असते. सर्व बौद्ध देशांमध्ये अशाच प्रकारच्या रथयात्रेचा उत्सव साजरा केला जातो. ह्या देशाच्या श्रेष्ठींनी आणि उपासकांनी शहरात धर्मादाय दवाखाने उघडले आहेत तेथे सर्व गरीब, निराधार, व व्यंग असलेले लोक जाऊ शकतात. येथे त्यांच्या सर्व गरजा पुरवल्या जातात. कोणते अन्न खावयाचे आणि कोणते औषध द्यायचे ते वैद्य सांगतात. बरे झाल्यावर ते दवाखाण्यातून घरी जाऊ शकतात"
सम्राट अशोक त्याच्या कार्यामुळे बोधिसत्व पदापर्यंत पोहचला होता. हा उत्सव मगधाची राजधानी पाटलीपुत्र मधील आहे. उत्सवाची तिथी ही दुसऱ्या महिन्याची अष्टमी दिली आहे. आता बर्याच लोकांना वाटेल पहिला महिना चैत्र तर दुसरा महिना वैशाख आहे. मग ही बुद्ध जयंतीचीच रथयात्रा असू शकेल पण मुळातच बुद्ध जयंती अष्टमीला होत नाही पौर्णिमेला होते. वैशाख कृष्ण अष्टमी चंद्रगुप्त मौर्य यांचा जन्म दिवस असला तरी त्यांना बोधिसत्व म्हणण्याचं कारण नाही कारण ते बौद्ध धर्मीय नव्हते. बौद्ध धर्मामध्ये त्यांना फारस म्हणजे अशोका इतकं महत्व नाही.

केतकर यांच्या ज्ञानकोशातील संदर्भावरून या गोष्टीची अडचण सुटते. केतकर ज्ञानकोश मध्ये असे म्हटलेलं आहे की - ' जुन्या पंचांग पद्धतीचा लक्षपूर्वक अभ्यास केला असता असे दिसून येईल की जरी शक आरंभ निरनिराळ्या काळी निरनिराळ्या दिवसांपासून केला होता तरी वर्षारंभ नेहमी फाल्गुन शुद्ध प्रतिपदेसच होत असे.

केतकर ज्ञान कोशातून हे स्पष्ट झालंय की पूर्वी वर्षांची सुरवात फाल्गुन महिन्यात सुरू होत होती. आणि त्यामुळे फाहियान याने वर्षाचा दुसरा महिना व अष्टमी जे म्हटलं आहे ते चैत्र शुक्ल अष्टमी या तिथीला म्हटलं आहे. या दिवशी हिंदू धर्मात दुर्गाष्टमी व अशोकष्टमी असते.

वासुदेव गोविंद आपटे यांनी लिहिलेल्या अशोक चरित्रामध्ये अशोकाचे जन्मनक्षत्र पुनर्वसु नक्षत्र आहे असे म्हटलेलं आहे. हे पुनर्वसु नक्षत्र चैत्र शुक्ल अष्टमी, दुर्गाष्टमी, अशोकाष्टमी या दिवशी येते.

उत्तरविहारठ्ठकथा मधील माहिती -

उत्तरविहारठ्ठ कथा हा ग्रंथ अशोकाचा मुलगा महिंद्र यांचा आहे. हा ग्रंथ म्यानमार या देशात सापडला असून सिद्धार्थ वर्धन सिंह यांनी त्याच प्रकाशन व भाषांतर केले आहे. या ग्रंथात सम्राट अशोक यांच्या जन्माविषयी पुढील माहिती मिळते.

"चेत्तमासे सुक्क-अट्ठमी दिवसे उपाजित्वा,
यस्सेसो दुल्लभो लोकों पातुभावो अभिण्हसो |
असोको आसि तेसं पुञ्ञतेजबलोद्धिको ||"
_________________ (उत्तरविहारट्ठकथायं-थेर महिन्द)

चैत्र मास की शुक्ल पक्ष की अष्टमी को उत्पन्न होकर जिनका संसार मे प्रादुर्भाव होना सदा दुर्लभ है जिनमे अशोक पुण्य तेज बल रिद्धी संपन्न है

अर्थात या ग्रंथावरून हे उघड झाले की चैत्र शुक्ल अष्टमी ला सम्राट अशोकाचा जन्म झाला. व याच चैत्र शुक्ल अष्टमी ला अशोकाची मोठ्या प्रमाणात जयंती देशभर साजरी होत होती असे फाहियान याच्या प्रवासवर्णन वरून मिळते

उत्तरविहारठ्ठ मध्ये आणखी काही महत्वाची माहिती मिळते या ग्रंथा मध्ये वैशाख कृष्ण अष्टमी या दिवशी सम्राट चंद्रगुप्त यांचा जन्म झाला अशी माहिती मिळते. त्याच बरोबर कार्तिक पौर्णिमेला सम्राट अशोक यांचं महापरिनिर्वाण झालं अशीही माहिती हा ग्रंथ देतो. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कौटिल्य याच मूळ नाव विष्णुगुप्त आहे. तो विष्णुगुप्त सम्राट चंद्रगुप्ताचा गुरू असला तरी तो त्याचा भाऊ होता अशी महत्वपूर्ण माहिती हा ग्रंथ देतो.

या माहितीमुळे इतिहासातील बरेच प्रश्न व वाद मिटले जाण्याची शक्यता आहे.

२०१४ पर्यंत अशोकाच्या जन्म तिथी चा कोणताच पुरावा आपल्याकडे नव्हता. २०१४ साली प्रथम बिहार सरकारने अशोक जयंती चैत्र शुक्ल अष्टमी या दिवशी साजरी केली. तेव्हाच हे पुरावे शोधले गेले असावेत. आता ह्या पुराव्यामुळे पुन्हा मोठ्या प्रमाणात अशोक जयंती देशभरात साजरी होईल अशी आशा वाटते.

संदर्भ-
१) उत्तरविहारठ्ठकथाय - थेर महिंद (संपादक - सिद्धार्थ वर्धन सिंह)
२) केतकर ज्ञान कोष
३) तीन चिनी प्रवासी - मा. शं. मोरे
४) the real birth place of buddha - chakradhar mohapatra
५) अशोक चरित्र - वासुदेव गोविंद आपटे

रविवार, ३० जानेवारी, २०२२

महाराष्ट्र नावाचा इतिहास


  मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात इ.स. ३६५ मध्ये कोरलेल्या 'एरण' गावाच्या स्तंभलेखात श्रीधर्मवरम्याचा आरक्षिक व सेनापती सत्यनाग याने स्वतःला 'महाराष्ट्रीय' असे म्हटले आहे. हा स्तंभलेखातील महाराष्ट्राचा उल्लेख सर्वात प्राचीन ठरतो. 

सम्राट अशोकाच्या काळात तिसऱ्या बौद्ध धम्म परिषदेत ठरल्यानुसार बौद्ध धम्माच्या प्रसारासाठी इ.स.पु. २४६ मध्ये महाधम्मरक्खीताला 'महारठ्ठ' देशात पाठवल्याचा उल्लेख महावंश व दिपवंश या बौद्ध ग्रंथात आढळतो. 

इ. स. ७ व्या शतकात चिनी यात्री युआनत्संग हा भारतात आला होता. त्याने चालुक्य राजा पुलकेशी (दुसरा) च्या राज्यास भेट दिली होती. या चालुक्यांच्या राज्याला त्याने 'मोहोलाच' म्हणजेच महाराष्ट्र असे म्हटले. 

ऐहोळी येथील (विजापूर जिल्हा मलप्रभा तीरी) जितेंद्र मंदिराच्या कोरीव लेखात पंडित राविकिर्तीकृत प्रशस्तीश्लोक दिले आहेत. त्यातील एका श्लोकात सत्याश्रय पुलकेशीने ९९ हजार गावे असणाऱ्या व महाराष्ट्रक नावाने ओळखल्या जाणाऱ्या तीनही प्रदेशांचे अधिपत्य मिळविले अशी नोंद आहे. हा लेख इ.स. ७१२ मधील आहे. 

श्री. व्यं. केतकर यांच्या मते महाराष्ट्र हा शब्द व भाषा वररूचीच्या काळी होती. वररूचीचा काळ ख्रिस्तपूर्व  ८००-६०० धरला आहे. 

महाराष्ट्र म्हणजे मोठे अथवा विस्तृत असा अर्थ रा. काणे काढतात. 

जॉन विल्सन यांनी महारांचे राष्ट्र ते महाराष्ट्र अशी महाराष्ट्राची व्युत्पत्ती त्यांनी दिलेली आहे. याच मताला अलेक्झांडर रॉबर्टसन, जोतिबा फुले, डॉ.एन. जी. भवरे व डॉ. पुरुषोत्तम खानापूरकर यांनी पाठींबा दिलेला आहे. 

श्री. वामनराव भट यांनी म्हटले आहे कि प्राचीन काळी महार हे एक राष्ट्र होते. 

डॉ. दत्तात्रय खानापूरकर यांच्या मते महार हे महाराष्ट्राचे मूलनिवासी असून ते एके काळी महाराष्ट्राचे राजे होते. 

राजारामशास्त्री भागवत यांच्या मते महार हे अतिपुरातन काळचे अस्सल देशी लोक असून ते नाग लोक होते. तसेच महारांचे राष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र होय. 

रामकृष्ण भांडारकर यांच्या मते राष्ट्रीक उर्फ रठ्ठ नावाचे प्रसिद्ध असे लोक होते. त्यांनीच स्वतःला 'महा' जोडून ते स्वतःला महारठ्ठ असे म्हणत. म्हणून त्यांच्या देशाला महारठ्ठ असे नाव पडले यालाच संस्कृत मध्ये महाराष्ट्र म्हणतात. 

श्री. एच. एल. कोसारे यांच्या मते महाराष्ट्र हे नाव ज्या भूप्रदेशाला लावण्यात येते. त्या भूभागात नागवंशाच्या महार गणाच्या लोकांनी प्राचीन काळात मोठ्या संख्येने येऊन निरनिराळ्या भागात वसाहती प्रस्थापित केल्या होत्या. इतरही गणाचे लोक या प्रदेशात होते. परंतु त्या सर्वांमध्ये महार नागांचा गण हा प्रमुख होता. महार हा गण अनेक कुलांचा बनलेला होता. महार गणाच्या लोकांनी जो भूभाग व्यापलेला होता आणि ज्या भूभागाचे स्वामित्व त्यांच्याकडे होते त्या प्रदेशाला 'महाराष्ट्र' अशी संज्ञा प्राप्त झाली. 

कॉम्रेड शरद पाटील म्हणतात - पैठणच्या पंचायतीत मायिता हरीने केलेला चक्रधारस्वामींचा बचाव वाया जाऊन त्यांना नाककानछेदाची शिक्षा झाल्यानंतर तो महाराष्ट्र त्यागाची घोषणा करताना म्हणाला, " तुझेया महाराचा महाराष्ट्र् होऊनि मीचि जातु असे." यातून महाराष्ट्र्र मुळात महार गणाचे अभिजन असल्याचे सूचित होते. (P. 100, जातीव्यवस्थाक सामंती सेवकत्व -  कॉ. शरद पाटील) 

ओपर्ट यांनी ‘भारतवर्षातील मूळ रहिवासी’ या शीर्षकार्थाच्या ग्रंथात महाराष्ट्रालाच मल्लराष्ट्र (मल्ल लोकांचे राष्ट्र) असे म्हटले आहे. मल्ल म्हणजेच मार आणि मार लोकांनाच म्हार म्हणतात. मार या शब्दाचे हळूहळू म्हार-महार असे रूप बनले असावे. मराठीत ही दोन्ही रूपे आढळतात. तेव्हा मल्लराष्ट्र व महाराष्ट्र हे एकाच अर्थाचे दोन शब्द प्रचारात होते. वि. का. राजवाडे यांनी नमूद केलेल्या मळवली, मालेगाव, मल्याण, मळसर, मळगाव, मलांजन, मळखेडे, मळवाण, मलोणी या मल्लराष्ट्र जातिसंबद्ध गावांचा याला आधार मिळतो. 

सोमवंशी बी. सी. हेच संदर्भ पुढे ठेवून म्हणतात 

"पैलवान लोक हातात आणि गळ्यात काळा दोरा बांधतात. तसेच महार लोकही हातात व गळ्यात काळा दोरा बांधत. मल्लविद्या हि अत्यंत जुनी विद्या असून तिचा उगम भारतातच अनार्यात झाला. महार हे येथील सर्वात जुने रहिवासी आहेत. व ते अनार्य होत. यावरून मल्लांचे म्हारांचे राष्ट्र ते महाराष्ट्र हि महाराष्ट्राची उत्पत्ती स्पष्ट होते." 

गुर्जर लोकांचे राष्ट्र जसे गुजराथ म्हणून ओळखले जाते तसे महार लोकांचे राष्ट्र महाराष्ट्र म्हणून ओळखले जाते. अशीही एक व्युत्पत्ती दिली जाते (महाराष्ट्राचा महार) 

मरहट्ट’ हा शब्द कानडी असून ‘झाडीमंडळ’ असा प्रदेशवाचक एक अर्थ व झाडीमंडळातील ‘हट्टीजन’ (पशुपालन करणारे धनगर-गवळी) असा दुसरा लोकवाचक अर्थ होता. असे शं. भा जोशी यांचे मत आहे 

हि सर्व मान्यवरांची मते लक्षात घेतल्यावर असे निष्कर्ष निघतात कि महाराष्ट्र हे नाव इ.स.पु ८०० ते ६०० पासून आढळून येते. दुसरे म्हणजे महाराष्ट्र हे नाव मोठे राज्य किंवा महारांवरून पडलेले नाव किंवा रठठावरून पडलेले नाव किंवा हट्टगार धनगर या लोकांवरून पडलेले अश्या तीन व्युत्पत्ती आपणासमोर येतात. आणि मल्ल आणि महार एकच असे ओपर्ट आणि सोमवंशी बी.सी. यांच्या मतावरून समजते. 

श्री. व्यं. केतकर थोडं वेगळं मत मांडताना दिसतात. 

ते म्हणतात -" महाराष्ट्र.... भाषेच्या नावास कारण झालेले जे महार आणि रठ्ठ यांचे एकराष्ट्रीकरण ते ख्रिस्तपूर्व दुसऱ्या सहस्रकात झाले असावे असे दिसते. अश्मक राजा कुरु युद्धात पडला आणि कुरु युद्धापासून अश्मकाचे सातत्य आहे, तर महार आणि रठ्ठ यांचे एकराष्ट्रीयकरण आणि अश्मक राज्याचे सातत्य याची संगती लावण्याचा प्रयत्न अवश्य होतो. दोन राष्ट्रे एकत्र व्हायची ती एकावर दुसर्याच्या विजयाने होतात. महार आणि रठ्ठ यांची देशभर मारामारी होऊन एकराष्ट्र होण्याची क्रिया अश्मक राज्य चालू असता घडणे शक्य नाही, तर अश्मक राज्य सुरु होण्यापूर्वीच महारांच्या देशात रठठाचा प्रसार होऊन महाराष्ट्र बनले असावे आणि त्यांच्या संयुक्त जनतेत अश्मक राजकुलोत्पन्न झाले असावे असाच इतिहास असावा असे दिसते. म्हणजे महाराष्ट्रच्या वैशिष्टयास म्हणजे महार आणि रठ्ठ यांच्या एकत्रीकरणास आरंभ कुरुयुद्धापूर्वीच झाला असला पाहिजे." असे सांगून केतकर पुढे म्हणतात 'महारांचे राष्ट्र ते महाराष्ट्र होय.' 

केतकरांच्या मते महार गण व रठ्ठ गणात संघर्ष व समेट होऊन महाराष्ट्राची निर्मिती झाली. 

महाराष्ट्रातील लोकांना रिस्ले यांनी सिथो-द्रविडियन म्हटलेलं आहे. 

तर एन.के.दत्त यांनी त्यांना इराणी-द्रविडियन म्हटलेलं आहे. त्यासाठी त्यांनी अशोकाच्या शिलालेखातील 'राठीक' यांच्याशी समांतर इराणी भाषेतील शब्द 'रथस्थ' म्हणजे लढवय्या या अर्थाने मिळतो. असा दाखला दिलेला आहे. 

रिस्ले, एन. के. दत्त, केतकर या तीनही मान्यवरांच्या मते महाराष्ट्रात दोन वंशाचे लोक राहतात हे स्पष्ट आहे. त्यातल्या त्यात केतकर व एन.के.दत्त रठ्ठ लोकांचा देखील एक वंश म्हणून उल्लेख करतात. तर दुसरा एन.के. दत्त यांनी दुसरा वंश द्राविडी सांगितला आहे आणि केतकरांनी तो महार गण पकडलेला आहे. 

रठ्ठ या शब्दाचे दोन अर्थ होतात एक राष्ट्र व दुसरा लढवय्या. तर रठ्ठ या शब्दाचे प्राकृत भाषेत रूप हट्ट होते व त्याचा अर्थ सुद्धा प्रदेश किंवा योद्धा असाच आहे. 

या महार (मल्ल) गण व रठ्ठ (हट्ट) गणाच्या संघर्ष आणि समेटातून दोन समाजाची निर्मिती झाली. 

एक महार-हट्ट (मऱ्हाट) समाज व दुसरा अंत्यज महार (ब्रोकन मॅन) 

अंत्यज महार हा मूळ महार गणांचा भाग होता तरी संघर्षामुळे ते मूळ गणापासून बाहेर फेकला गेला. व अंत्यज ठरले. 

मराठा समाज हा महार (मल्ल) गण व रठ्ठ गणाच्या संघर्षा नंतरच्या समन्वयातून निर्माण झाला 

म्हणजेच महार+रठ्ठ = महारठ्ठ 

महारठी म्हणजेच मराठे असे भांडारकर म्हणतात. 

महार (मल्ल) गण नागवंशीय तर रठ्ठ गण यदुवंशीय आहेत. राष्ट्रकूट स्वताला यदुवंशी म्हणवून घेतात त्याच बरोबर रठ्ठ नावाच्या राजापासून त्यांचा वंश निर्माण झाला असेही म्हणतात. 

महाराष्ट्र कुळवंशावली मध्ये मराठा समाज दोन वंशांचा मिळून बनलेला आहे असे म्हटलेलं आहे ते दोन वंश म्हणजे नागवंश व यदुवंश. (क्षत्रियांचा इतिहास - काशिनाथ देशमुख) 

या दोन वंशाच्या संघर्ष समेटाचा प्रभाव महाराष्ट्रावर तर पडलाच पण या दोन समाजावर देखील पडला. 

महार त्यांची अंत्यज स्थितीला कृष्ण ला जबाबदार धरतात. त्याचे कारण रठ्ठ (यदु)  लोकांच आराध्य कृष्ण आहेत 

कृष्णाला जबाबदार धरताना चोखामेळा आपल्या अभंगात म्हणतो. 

मी यातीहीन महार | पूर्वी निळाचा अवतार

कृष्ण निंदा घडली होती | म्हणून महार जन्मप्राप्ती 

कृष्णाने नागांच खांडववन जाळल्याची कथा तर प्रसिद्ध आहेच. पण यदूंचा महाराष्ट्रात प्रवेश खरंतर महार अंत्यज ठरण्याला कारणीभूत झाले. 

म्लेंछ (नाग) मर्दन करतो म्हणून केशवाला कलंकित ठरवणारे अंत्यज महार (नाग) पुढे बौद्ध बनले. व त्यांना अस्पृश्यता लागली. 

मराठा समाजावर काय परिणाम झाला हे १९२७ साली कोर्टाने दिलेल्या निकालातून समजते ते म्हणजे कोर्टाने ९६ कुळी व ५ कुळी मराठ्याना क्षत्रिय तर कुणबीना शुद्र ठरवले. 

महाराष्ट्रावर देखील याचा मोठा परिणाम घडून आला. महाराष्ट्रातील बहुतांश स्थानांच कृष्णकरण किंवा शैविकरण झाले. 

याच एक उदाहरण म्हणजे खंडोबा. खंडोबाचे प्राचीन नाव मल्लिकार्जुन. 

पण खंडोबाचे मल्हारीमाहात्म्य सांगण्यात येते त्याची कथा सांगताना मल्ल दैत्याचा वध करताना खंडोबाला दाखवले जाते. 

खरंतर खंडोबाला दक्षिणेत मल्लणा, मल्लय किंवा जैन लोक खंडोबाला मल्लिनाथ ह्या नावाने ओळखतात. मल्लूखान हे नावही काही ठिकाणी घेतले जाते. 

मल्लण व मल्लय हि दोन नावे या देवाच्या नावाचा मूळ अंश 'मल्ल' असा कल्पून त्यापुढे अण्ण व अय्य हे प्रतिष्ठासूचक प्रत्येय लागून बनलेली आहेत. (दक्षिणेचा लोकदेव श्री. खंडोबा - रा. ची ढेरे) 

धनगरांच्या ब्रमल-बरमल-विरमल्ल या मूळ नावाने खंडोबा ओळखला जातो. 

या विरमल्ल देवाचे जे उल्लेख धनगर लोकसाहित्यात येतात त्यात विरमल्ल हा नागाच्या स्वरूपात आपणाला दिसतो 

कर्हे पठारावर वारूळस्थ नागाच्या स्वरूपात आदिमैलार म्हणून खंडोबा पूजला जातो. 

वर आपण पाहिलंच कि महाराष्ट्राच दुसर नाव मल्ल राष्ट्र होत हे. जो महाराष्ट्रात पूजला जातो. तो मल्लाचा अरि (शत्रू) कसा असू शकेल ? 

मल्हारी हे विशेषण कृष्णाच आहे. रठ्ठ च्या आगमनाने खंडोबाचे कृष्णकरण आणि शैवीकरन घडून आले त्याच्या मूळ नागरूपाचा लोप घडून आला. 

ज्या शैवांकडून खंडोबा धिक्कारला गेला होता. त्याच खंडोबाच शैविकरण घडून येते. हेच मोठं आश्चर्य आहे. पण हे सत्य आहे. 

बुद्ध काळात प्रत्येक व्यक्ती गण नावाने ओळखला जायाचा. जात व्यवस्थेमुळे नंतरच्या काळात सर्वानी गणाच्या नावाला तिलांजली दिली व ते वर्ग जातीच्या (व्यवसाय)नावाने ओळखले जाऊ लागले. 

मल्ल (किंवा कोणत्याही) गणातील प्रत्येक जाती वर्गाला त्यांच्या स्वताच्या व्यवसायानुसार जातींनाम प्राप्त झाले पण महारांचा असा कोणताही विशिष्ट व्यवसाय न ठरल्यामुळे ( ते बावन्न प्रकारची कामे करतात) त्यांच्या वर्गाला मूळ गणाचेच नाव चिकटून राहिले असावे. 

किंवा 

महारकी हा शब्द महारांशी संबंधित आहे. तो महाररक्ख या सातवाहन कालीन शब्दाशी संबंधित आहे. महाररक्ख म्हणजे महार-रक्षक. तर महारहट्ट  चे पुढे मऱ्हाटा झाले असावे. मराठा व महारकी या शब्दातील महार हा शब्द मल्ल- माल- महाल- महार असा आल्यामुळे मल्ल या गणाचेच पुढचे महार हे रूप आहे. महाराष्ट्राचे नाव मल्ल राष्ट्र म्हणतात ते योग्य आहे. त्याचेवरूनच विस्तार होऊन महाराष्ट्र हे नाव आपल्या प्रांताला मिळालं आहे. 

मराठयांमध्ये महारांप्रमाणेच पूर्वी नावामागे नाक लावण्याची प्रथा होती (मराठयांचा इतिहास - ह. वा. करकरे)

महारात तर नावामागे नाक लावण्याची प्रथा घराघरात होती. नाक हा नाग शब्दांचा अपभ्रंश आहे. महारांचा मूळ पुरुष नाग होता अशी मान्यता आहे. मल्ल हा वंश नाग वंश आहे. सातवाहन शिलालेखात अनेक नाक प्रत्यय असलेली नावे आढळतात. मगधाचा राजा नागवंशी शिशुनाग याला शिशुनाक या नावानेही संबोधण्यात आले आहे. 

तसेच महारात असलेला जोहार हा अभिवादानाचा प्रकार मराठ्यात सुद्धा होता (studies in marathaa history vol 1) 

रोहिडखोर्यातील ज्या रोहिडेश्वरापुढे छत्रपती शिवाजी माहाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली तो मूळचा रोहिडमल्ल होता. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी मानववंशशास्त्राच्या अभ्यासातून असे निदर्शनास आणले की मराठा व महार ज्ञातीची कुळे सारखीच आहेत. वस्तुतः या दोन ज्ञातीतील कुळामध्ये इतके मोठे साम्य आहे की मराठा ज्ञातीतील असे एकही कुल असे नाही की जे महारात नाही. देवके कुल व गोत्र यांचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन असे म्हणता येते की ज्यांची देवके कुळे सारखीच आहेत ते परस्परांचे सगोत्र भाऊबंद असले पाहिजेत आणि ते जर भाऊबंद आहेत तर ते एकाच वंशाचे असले पाहिजे हे सिद्ध होते. 

कधी काळी महार मराठे एकत्र होते. त्या दोहोंमधील असणाऱ्या मल्ल गणावरून या राज्याला महाराष्ट्र हे नाव प्राप्त झाले. 

आदिम समाज टोळ्यांनी बनलेला होता. त्या टोळ्यांचे पुढे गण तयार झाले. सातव्या पिढीत गण विभागले जात होते. म्हणून गणांची संख्या वाढली. बुद्ध काळापर्यंत बरेच गण आपल्याला पाहायला मिळतात. पुढे जातीव्यवस्था निर्माण झाल्यावर गणाच्या नावाचं महत्व लोप पावले व जातीला महत्व आले. व्यवसायावरून जाती पडल्या तर काही जातींना त्यांच्या गणाचीच नावे चिकटून राहिली. महाराष्ट्र्र हा दोन तीन गणांचा मिळून बनलेला आहे. त्यात मल्ल, रठ्ठ, व कोलीय गण प्रमुख आहेत. मल्ल व कोलीय एकाच गणाचे दोन भाग झाले असण्याची शक्यता आहे. या तीन किंवा अधिक गणाच्या संघर्ष समन्वयातून आजच्या महाराष्ट्राची निर्मिती झाली आहे. 


संदर्भ-

१ अस्पृश्य मूळचे कोण ? - डॉ. आंबेडकर

२ प्राचीन भारतातील नाग - एच. एल. कोसारे

३ लज्जागौरी - रा. ची. ढेरे

४ श्रीविठ्ठल : एक महासमन्वय - रा. ची. ढेरे

५ शिवकाळ व पेशवाईतील महारांचा इतिहास - डॉ. अनिल कठोरे

६ वि. का. राजवाडे लेखसंग्रह

७ वि.रा. शिंदे लेखसंग्रह

८ दक्षिणेचा लोकदेव श्री. खंडोबा - रा. ची. ढेरे

९ जातीव्यवस्थाक सामंती सेवकत्व -  कॉ. शरद पाटील

१० महार कोण होते ? - संजय सोनवणी

बुधवार, २६ जानेवारी, २०२२

भारतीय संविधानाची निर्मिती


अनेकांना १५ ऑगस्ट व २६ जानेवारीमध्ये फरक समजत नसतो. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी देशाशी संबंधित दिवस असून त्यादिवशी राष्ट्रीय सुट्टी असते एवढीच माहिती अनेकांना असते. काही लोक हे दोन्ही दिवस इंग्रजानी दिलेल्या स्वातंत्र्या दिनाशी संबंधित मानतात. पण १५ ऑगस्ट हा जरी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याचा दिवस असला तरी भारतीय संविधान हे आपल्याला राजकीय आर्थिक सामाजिक गुलामगिरी मधून मुक्त करण्यासाठी लिहिलं गेलं आहे व ते जेव्हापासून लागू झाले तो दिवस म्हणजे २६ जानेवारी १९५०. तेव्हापासून दरवर्षी आपण प्रजासत्ताक  (म्हणजे लोकांचं राज्य) दिन साजरा करत असतो 

भारतीय घटनेची निर्मिती -

१९४५ मध्ये द्वितीय महायुद्ध समाप्त झाले आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या प्रश्नाला प्राधान्य प्राप्त झाले.

या प्रश्नावर विचार विनिमयासाठी ब्रिटिश शासनाने एक त्रिसदस्यीय शिष्टमंडळ भारतात पाठवले. या शिष्ट मंडळाने (कॅबिनेट मिशन) १६ मार्च १९४६ रोजी सत्ता हस्तांतरणाची आपली योजना घोषित केली. तसेच भारताचा भावी राज्य कारभार चालविण्याच्या दृष्टीने संविधान निर्मितीसाठी एक संविधान सभा स्थापन करण्यात यावी असे या योजनेत सूचित करण्यात आले. 

मे १९४६ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या ' कॅबिनेट मिशन प्लॅन' मध्ये संविधान सभेच्या निर्मितीची तरतूद करण्यात आली. 

त्या तरतुदीनुसार संविधान सभेत ३८९ सदस्य असतील. त्यापैकी २९२ सदस्य ११ ब्रिटिश प्रांताकडून निवडून दिले जातील, ४ सदस्य  चीफ कमिशनर प्रांताकडून (दिल्ली , अजमेर-मारवाड, कुर्ग व बलुचिस्तान) निवडून दिले जातील आणि ९३ सदस्य भारतीय संस्थानिकांचे प्रतिनिधी असतील. 

जागांचे विभाजन तीन प्रमुख गटांमध्ये केले जाईल ते तीन गट म्हणजे शीख, मुस्लिम व साधारण. 

जुलै १९४६ रोजी निवडणुका घेण्यात आल्या २९६ जागांसाठी त्यापैकी काँग्रेसने २०८, मुस्लिम लिगने ७३, अपक्ष ८ तर इतर पक्षांना प्रत्येकी एक अश्या ७ जागा मिळाल्या 

१८ जुलै १९४७ रोजी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा संमत झाला. पाकिस्तान निर्मिती मुळे मुस्लिम लीगचे सदस्य पाकिस्तान मध्ये निघून गेले त्यामुळे संविधान सभेची सदस्य संख्या कमी होऊन २९९ इतकी झाली यात संस्थानिकांचे ७० प्रतिनिधी तर प्रांताचे २२९ प्रतिनिधी होते. 

९ डिसेंबर १९४६ रोजी संविधान सभेचे पाहिले अधिवेशन भरले त्यात २११ सदस्य उपस्थित होते. जमीनदार व संस्थानिक या लोकांचा आपल्या हक्क व सवलती वर गदा येऊ नये म्हणून त्यांचा घटना समिती या संकल्पनेला विरोध होता म्हणून ते या संविधान निर्मितीच्या कार्यात सुरवातीला सहभागी झाले नाही. 

संविधान सभेचे अध्यक्ष पदावर डॉ. राजेंद्र प्रसाद  यांची निवड करण्यात आली. बी एन राव संविधान सभेचे सल्लागार होते. 

संविधान सभेत एकूण २२ उपसमित्या निर्माण करण्यात आल्या. त्यातील सर्वात प्रमुख समिती म्हणजे घटना लेखन समिती (drafting committee) आहे. अभ्यासपूर्वक घटना लिहिण्याचं प्रमुख कार्य या समितीने पार पाडलं. 

या घटना लेखन समितीचे अध्यक्ष होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व या समितीत एकूण ७ सदस्य होते. 

या घटना लेखन समितीने २१ फेब्रुवारी १९४८ रोजी आपला मसुदा प्रकाशित केला. भारतीय जनतेला व संविधान सभेतील सदस्यांना मसुद्यात सुधारणा सुचविण्यासाठी आठ महिन्यांचा कालावधी देण्यात आला. काही सुचनांनाचा विचार करून त्याला संविधान सभेत उत्तरे देण्यात आली. 

४ नव्हेंबर १९४८ रोजी घटनेचा अंतिम मसुदा डॉ. आंबेडकरांनी संविधान सभेत मांडला. मसुद्याचे तीनदा वाचन व चर्चा झाल्यानंतर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना स्वीकृत करण्यात आली. 

पुढे २४ जानेवारी १९५० रोजी उपस्थित असलेल्या २८४ सदस्यांनी घटनेवर सह्या केल्या. घटनेच्या तीन प्रतींवर सह्या करण्यात आल्या. १ इंग्रजीतील छापील प्रत १ इंग्रजीतील हस्तलिखित प्रत आणि १ हिंदीतील हस्तलिखित प्रत. 

घटना २६ नव्हेंबर १९४९ ला स्वीकारण्यात आली तरी 

घटनेचा अंमल २६ जानेवारी १९५० पासून सुरू झाला. त्याच कारण १९२९ च्या काँग्रेसच्या लाहोर अधिवेशन ठरावानुसार २६ जानेवारी १९३० हा दिवस भारताचा प्रथम स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला होता म्हणून २६ जानेवारी ही तारीख संविधान अंमलबजावणी तारीख ठरवण्यात आली 

घटना तयार होण्यासाठी २९ ऑगस्ट १९४७ ते २६ नव्हेंबर १९४९ म्हणजे २ वर्षे ११ महिने १८ दिवस लागले असले तरी घटना लेखन समितीने १४१ दिवसात संविधानाचा मसुदा बनवला. संविधान सभेची ११ अधिवेशने झाली त्यात १६६ दिवसांपैकी ११४ दिवस घटनेच्या मसुद्यावर चर्चा झाली. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाचे शिल्पकार का म्हणतात ???? 

संविधान सभेत जरी २५० पेक्षा जास्त सदस्य असले तरी ते फक्त संविधानातील तरतुदीवर चर्चा व कलम पास की नापास एव्हढ्यापुरतेच मार्यादीत होते. संविधानाची मूळ निर्मिती घटना लेखन समिती (drafting comittee) या समितीने केली. त्यात सात सदस्य जरी असले तरी जवळपास सर्व काम हे डॉ. आंबेडकरांनी केले म्हणून त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात. 

श्री टी. टी कृष्णम्माचारी (मद्रास सामान्य मतदारसंघ मधून संविधान सभेवर आलेले व drafting comittee चे मेंबर) यांचे भाषण - 

'या सभागृहाला याची जाणीव असेल की याच सभागृहाने मसुदा समितीवर ज्या सात सदस्यांची नियुक्ती केली होती. त्यापैकी एकाने या सभागृहाचा राजीनामा दिला म्हणून त्याच्या जागी दुसर्याना नियुक्त करण्यात आले. एक सदस्यांचा मृत्यू झाला आणि ती जागा रिकामीच राहिली. एक सदस्य दूर अमेरिकेत निघून गेले आणि त्यांचीही जागा भरली गेली नाही. दुसरे एक सदस्य राज्याच्या राजकारणात व्यस्त होते. एक दोन सदस्य दिल्लीपासून फार दूर होते आणि कदाचित प्रकृती स्वास्थ्याच्या कारणास्तव त्यांनी बैठकीत भाग घेतलाच नाही. याचा अंतिम परिणाम असा झाला की या संविधानाचा मसुदा तयार करण्याची संपूर्ण जबाबदारी डॉ. आंबेडकर यांच्यावर आली आणि त्यांनी हे महत्वपूर्ण कार्य निःसंशय अत्यन्त समर्थपणे पूर्ण केले यात तिळमात्र शंका नाही याकरिता आम्ही त्यांचे कृतज्ञ आहोत' 

संविधान सभेतील आणखीही काही सदस्यांनी डॉ. आंबेडकरांचे अभिनंदन केले त्यातील काही प्रतिक्रिया - 

काझी सय्यद करीमुद्दीन (मध्यप्रांत आणि वर्हाड, मुस्लिम मतदारसंघ) - ....भारताच्या भावी पिढ्या महान संविधान निर्माता म्हणून डॉ. आंबेडकरांची नोंद घेतील याची खात्री आहे. 

पंडित लक्ष्मीकांत मित्रा (पश्चिम बंगाल, सामान्य मतदारसंघ) - मी डॉ. आंबेडकर यांच्या दैदिप्यमान कर्तृत्वाबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. संविधानाच्या प्रस्तावाला निश्चित रूप व आकार देण्यासाठी त्यांनी आपला अमूल्य वेळ आणि शक्ती खर्च केली त्याबद्दल हे सभागृह त्यांचे अभिनंदन करते. 

श्री. एस नागप्पा - हे संविधान निर्माण करण्यात डॉ. आंबेडकरांना जे अपार कष्ट उपसावे लागले त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचे अभिनंदन करतो हे एक बृहत्कार्य होते यात शंका नाही तरीही त्यांनी एवढ्या अल्प कालावधीत ते यशस्वीरीत्या पूर्ण केले त्याबद्दल त्यांचे आभार 

काहींनी  संविधान मसुद्यावर टीकाही केल्या. 

श्री अरुनचंद्र गुहा (पश्चिम बंगाल सामान्य मतदारसंघ) - 'या संपूर्ण मसुद्यात काँग्रेसच्या दृष्टीकोणाचा कोठे मागमूसही दिसत नाही. या मसुद्यात गांधीवादाच्या सामाजिक राजनैतिक विचाराचे कोठेही प्रतिबिंब दिसत नाही. विद्वान डॉ. आंबेडकरांना आपल्या विद्वत्ता पूर्ण भाषणात गांधींचा उल्लेख करावा असा एकही प्रसंग आढळला नाही किंवा काँग्रेसचा उल्लेख करावा असा एकही प्रसंग त्यांना आढळत नाही. पण यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. संपूर्ण संविधानात विशेषत्वाने काँग्रेसची विचारसरणी आणि आदर्श यांचा अभाव आहे असे मला वाटते' 

पंडित ठाकुरदास भार्गव (पूर्व पंजाब सामान्य मतदारसंघ) - ' 'मसुदा समितीला गांधीजींचे मन नव्हते. भारतातील करोडो लोकांच्या भावना या कॅमेरात प्रतिबिंबित व्हाव्यात असे ज्यांना वाटत होते त्या गांधीजींचे मन मसुदा समितीकडे नव्हते' 

संविधानात गोहत्या बंदी संबंधीचे प्रावधान नाही, गांधीजी बद्दल कोणताही उल्लेख संविधानात नाही, राष्ट्रध्वज व राष्ट्रगान यासंबंधी उल्लेख संविधानात नाहीत त्याचबरोबर देवाचा सुद्धा उल्लेख संविधानात नाही म्हणून काही जण नाराज होते 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान सभेत प्रवेश कसा झाला ??? 

संविधान सभेच्या सदस्य निवडी साठी निवडणुका घेण्यात आल्या. या निवडणुका प्रांतीय विधान मंडळाच्या निर्वाचित सदस्यद्वारे करण्यात आल्या. काँग्रेसच्या विरोधामुळे डॉ. आंबेडकर मुंबई विधान मंडळातून निर्वाचित होऊ शकले नाही. तेव्हा त्यांना संविधान सभेवर पाठवण्यासाठी जोगेंद्रनाथ मंडळ यांनी प्रयत्न केले. त्यांच्या व काही स्थानिक दलित संघटन व मुस्लिम लीग च्या पाठींब्यामुळे  बंगाल विधान मंडळातून डॉ. आंबेडकर संविधान सभेवर पोहोचले. 

पटेल आणि काँग्रेस हे डॉ आंबेडकरांसाठी सांविधान सभेची दारच काय खिडक्या सुद्धा बंद आहेत. बघूया ते कसे आत शिरतात ? असे म्हणत होते तरीही मुस्लिम लीग व जोगेंद्रनाथ मंडळ व काही दलित संघटना यांच्यामुळे ते संविधान सभेत पोहोचले पण.. 

लवकरच पाकिस्तान निर्मिती मध्ये बाबासाहेबांचे भारतीय संविधान सभेतील सभासदत्व रद्द झाले. या मागेही काँग्रेसचा हात होता असे म्हटले जाते. कारण ज्या जेसोर व खुलना मतदारसंघातुन डॉ आंबेडकर संविधान सभेवर निवडून गेले तो हिंदू दलित बहुसंख्य भाग होता. मुस्लिम तेथे ५०% पेक्षा कमी होते त्यामुळे तो भाग पाकिस्तान मध्ये जाण्याची गरज नव्हती. डॉ. आंबेडकर यांच सभासदत्व रद्द व्हावे म्हणून हे केलं गेलं असा दलित कार्यकर्ते नेत्यांचा समज झाला. त्यात तथ्य किती हे समजत नाही पण ब्रिटन मधील ब्रिटिश शासन विरोधी पक्षांनी टीका करेपर्यंत तरी काँग्रेसला डॉ. आंबेडकर संविधान सभेत नको होते. 

या नन्तर डॉ. आंबेडकर ब्रिटन मधील इंग्रज शासनाच्या विरोधी पक्षांना भेटले. त्यांना ब्रिटिश आणि काँग्रेस यांच्या अस्पृश्याच्या हितसंबंध सुरक्षित ठेवण्याच्या १९४२ च्या कराराची आठवण करून दिली. 

त्यामुळे या करारामुळे डॉ आंबेडकरांना पुन्हा संविधान सभेत घेणं भाग पडले. त्यांना मुंबईतून जयकरांच्या जागी काँग्रेसला निवडून देणे भाग पडले 

ब्रिटन मधील ब्रिटिश शासनाच्या विरोधी पक्षांनी त्यांच्या हाऊस ऑफ कॉमन्स (लोकसभा) मध्ये भारतीय संविधान सभेवर टीका टीका केल्या होत्या त्यात संविधान सभा कशी फक्त सवर्ण हिंदूंच हित पाहते अश्या प्रकारच्या त्या टीका होत्या. 

हाऊस ऑफ कॉमन्स (लोकसभा) मध्ये बोलताना चर्चिल यांनी भारताचे संविधान सभा फक्त एका जातीची प्रतिनिधित्व करते असा अभिप्राय व्यक्त केला होता. तर विस्काऊट सायमन यांनी हाऊस ऑफ लोर्ड्स मध्ये बोलताना संविधान सभेला 'हिंदूंची संघटना ' असे संबोधून ' काय दिल्ली येथे होणाऱ्या सवर्ण हिंदूंच्या मिटींगला सरकार संविधान सभा म्हणून मान्य करू शकते ???' (संविधान सभेतील वादविवाद खंड -२) 

अश्या प्रकारच्या सतत होणाऱ्या टिकांचा स्वाभाविक परिणाम संविधान सभेवर झाला. 

ब्रिटिशांनी मुसलमान, शीख व हिंदू असे तीन गट मानले होते. मुसलमानाना पाकिस्तान मिळाले होते. मुसलमान पाकिस्तानात गेल्यामुळे पंजाब मध्ये शीख बहुसंख्य झाले त्यामुळे त्यांचाही प्रश्न थोड्या प्रमाणात सुटला होता. हिंदू मध्ये सवर्ण दलित असे दोन गट होते. सवर्ण राज्यकर्ते होते पण अस्पृश्याना काही वाटा मिळाला नव्हता त्यांना हिंदू गटातून वाचलेलं काही मिळणार होत पण काँग्रेस आणि इंग्रज यांच्यात अस्पृश्याचा हितसंबंध सुरक्षित ठेवण्यावर करार झाला होता. शेड्युल कास्ट फेडरेशन ला हे मान्य नव्हते त्यांना वाटत होते की काँग्रेसी सवर्ण हा करार पाळतील यावर त्यांचा विश्वास नव्हता. पुणे करार सारखाच तो घातक वाटत होता. आणि झालेही तसेच काँग्रेसने डॉ. आंबेडकरांना संविधान सभेत येण्यापासून रोखण्यासाठी पराकाष्ठा केली होती. 

शेवटी ब्रिटन मधील ब्रिटिश शासनाच्या विरोधी पक्षाला काँग्रेस करार पाळत नसल्याचे सिद्ध करण्यात डॉ. आंबेडकर यशस्वी ठरले याचा परिणाम स्वताच्या मनाविरुद्ध जाऊन काँग्रेसला १५ ऑगस्ट १९४७ स्वातंत्र्य दिनी  आंबेडकरांना कायदा मंत्री बनवून लगेचच दहा पंधरा दिवसात २९ ऑगस्ट १९४७ रोजी घटना लेखन समितीची (drafting committee) स्थापना डॉ आंबेडकरांच्य अध्यक्षतेखाली करावी लागली. 

काही लोक गांधीजींमुळे नेहरूंमुळे डॉ. आंबेडकर संविधान सभेत गेल्याच श्रेय देतात ते खोटं आहे. डॉ. आंबेडकर १९४२ चा करार व दबाव या गोष्टींमुळे संविधान लेखन समितीच्या अध्यक्षपदी पोहोचले. 

भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये - 

भारताची घटना जगातील सर्व लिखित घटनांमध्ये सर्वात मोठी घटना आहे. १९४९ च्या मूळ घटनेत एक प्रस्ताविका , २२ भाग ३९५ कलमे आणि ८ अनुसूची होत्या. यात आता वाढ झाली असून सध्या भारताच्या घटनेत २५ भाग, ४६१ कलमे आणि १२ अनुसूची आहेत. 

आपली राज्यघटना जगातील सर्व ज्ञात राज्य घटनेचा अभ्यास करून तयार करण्यात आली आहे 

भारतीय घटनेने धर्मनिरपेक्ष राज्याची निर्मिती केली आहे. घटनेच्या विविध तरतुदींवरून भारतीय राज्याचे धर्मनिरपेक्ष स्वरूप स्पष्ट होते 

राज्य घटनेच्या पहिल्या कलमातच आपल्या देशाचे नाव इंडिया आणि भारत ही दोनच नावे अधिकृत समजली गेली आहेत त्यात कोणतेही तिसरे नाव नाही. 

मूलभूत हक्क घटनेचा अविभाज्य भाग असून साधारण कायद्याद्वारे त्यात बदल करता येत नाही किंवा रद्द करता येत नाही. घटनेच्या मूलभूत संरचनेत कोणत्याही कायद्याने बदल करता येत नाही. 

मूलभूत हक्क सहा प्रकारचे आहेत

समानतेचा हक्क

स्वातंत्र्याचा हक्क

शोषणाविरुद्धचा हक्क

धर्म स्वातंत्र्या चा हक्क

सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क

घटनात्मक उपायांचा हक्क 

घटनात्मक उपायांचा हक्क (कलम ३२)  चे वर्णन डॉ. आंबेडकरांनी 'असे कलम ज्याविना ही घटना व्यर्थ ठरेल. हे कलम घटनेचा खरा आत्मा असून त्याचे खरे ह्दय ही आहे' 

प्रसिद्ध जय भीम सिनेमा हा ह्या कलम ३२ वरच आधारित आहे. 

घटनेतील मार्गदर्शक तत्वाबद्दल बोलताना  न्यायमूर्ती एम सी छागला म्हणतात 'मार्गदर्शक तत्वांचे पूर्ण पालन झाले तर भारत पृथ्वी वरील स्वर्ग होईल.' 

पण घटनेची पूर्ण अमलबजावणी करणार सरकार कधी आलेच नाही त्यामुळे काही लोकांचा असा समज होतो की मुळातच आपल्या राज्यघटनेतच काहीतरी चूक आहे 

या बाबतीत डॉ. आंबेडकरांचं प्रसिद्ध वाक्य आहे. 

संविधान कितीही चांगले असू द्या पण तिला राबवणारे लोक प्रामाणिक नसतील तर ती घटना वाईट ठरेल व घटना कितीही वाईट असू द्या पण राबवणारे लोक चांगले असतील तर ती घटना चांगली ठरेल. 

घटना दुरुस्ती - 

भारतीय राज्यघटनेत १०० पेक्षा जास्त वेळा दुरुस्ती झाली असे म्हटले जाते पण या सर्व दुरुस्ती नसून घटनेत वेळेनुसार अधिकच्या टाकलेल्या गोष्टी आहेत. उदाहरणार्थ - 

१) १९६२ ला पोर्तुगीजांकडून स्वातंत्र्य मिळवल्यानंतर गोवा दीव दमन ला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला  गेला तिलाही घटना दुरुस्ती म्हणतात 

२)नागालँड भारताचं १६ वे राज्य बनले तिलाही घटना दुरुस्ती म्हणतात 

३) सिक्कीम २२ वे राज्य बनले तिलाही घटनादुरुस्ती म्हणतात 

४) गोवाही २५ वे राज्य बनले तिलाही घटनादुरुस्ती म्हणतात 

ही जी काही उदाहरणे दिलीत ती दुरुस्तीची नसून वेळेनुसार झालेल्या ऍडिशन ची उदाहरणे आहेत. पण तिला सुद्धा घटना दुरुस्तीच म्हणतात. घटनेत काही चुकीचं आहे म्हणून बदल केलेली ही उदाहरणे नाहीत. अश्याच प्रकारच्या जवळपास सर्व दुरुस्त्या आहेत 

घटनेच्या ३६८ कलमानुसार घटना दुरुस्ती करता येत असली तरी घटनेच्या मूलभूत ढाच्यात बदल करता येत नाही. 

संविधान बदलण्याच्या घटना - 

भारतीय संविधानाच्या मुलुभूत ढाच्यात एकदाच बदल करण्यात आला होता तो म्हणजे इंदिरा गांधींच्या आणीबाणी काळात(१९७५). ४२ वी घटना दुरुस्ती जिला मिनी राज्य घटना म्हणतात. या घटना दुरुस्तीने मूळ घटनेच्या ढाच्यात स्वार्थासाठी बदल केला गेला होता. त्याचे गंभीर परिणाम देशात झाले. बेकायदेशीररित्या आणीबाणी लावून हे बदल केले गेले होते. १९७७ मध्ये आलेल्या जनता सरकारने ४४ वी घटनादुरुस्ती करून यातील बरेचसे बदल पूर्वीसारखे केले तरी काही बदल आजही तसेच असून त्याचे वाईट परिणाम आजही देशावर होतात. 

संविधान बदलाचा दुसरा प्रयत्न अटल बिहारी वाजपेयी यांनी केला. २२ फेब्रुवारी २००० रोजी संविधान पुनर्विलोकन आयोग नेमण्यात आला. या आयोगाचे अध्यक्ष न्या. एम. एन. व्यंकटचलय्या हे होते. या आयोगाने ३१ मार्च २००२ रोजी अहवाल सादर केला मात्र तो स्वीकारण्यात आला नाही. 

घटना बदलण्याचा मूर्खपणा - देशाचं विघटन 

संपूर्ण घटना बदलाची प्रक्रिया १९७७ नंतर फारच अवघड बनलेली आहे. आणीबाणीच्या परिणामातून पुन्हा जाता येऊ नये म्हणून घटनेतील दुरुस्ती थोडी कठीण करण्यात आली. घटनेत पूर्णता बदल करायचा असेल तर एकाच वेळी लोकसभा, राज्यसभा, व देशातील निम्म्याहून जास्त राज्यात संख्या बळ हवे तरच देशाची पूर्ण राज्यघटना बदलता येऊ शकेल. पण हे केव्हा घडू शकेल ? जेव्हा संपूर्ण देशात लोकसभा व विधान सभेच्या निवडणुका एकसाथ घेतल्या जातील तेव्हाच ते शक्य होईल. कारण पूर्ण देशात एकाच वेळी जनतेला मूर्ख बनवून सत्ता मिळवून संविधान बदल शक्य होईल. वेगवेगळ्या वेळी इलेक्शन घेतल्याने हे शक्य होणार नाही. त्यामुळे सध्या one nation one election चा नारा दिला जातो. कारणे काही दिली जात असली तरी संविधानात बदल करणे हा त्या नार्याचा उद्देश आहे. 

संविधान बदलाचे परिणाम - 

संविधानाने अनेक जाती वंश भाषा विचार असलेल्या लोकांना एकत्र बांधून ठेवलेलं आहे. संविधान एक वेगवेगळ्या लोकसमूहातील करार आहे. ज्या दिवशी संविधान बदललं जाईल त्या दिवशीपासून संविधानाच्या या करारातुन प्रत्येक समूह हा वेगळा होत जाईल. देशाचं विघटन होण्याची सुरुवात होईल. दक्षिणेकडचे लोक द्रविड स्थान घेतील, ईशान्य कडचे लोक वेगळे होतील, काश्मीर तर आधीच मागणी लावून बसलाय, पंजाब सुद्धा वेगळे होईल. दलित वेगळ्या देशाची मागणी करतील, संरक्षणा अभावी आदिवासीं सुद्धा वेगळे होतील. फुटीरता वाढून परिणामी देशाचा बाल्कन प्रदेश निर्माण होईल. 

हे सर्व होऊ द्यायचं नसेल तर देशातील संविधान.जो वेगवेगळ्या समूहांचा करार आहे त्याच संरक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. 

संदर्भ - १) संविधान सभेतील वादविवाद खंड - २ 

२) संविधान सभेतील वादविवाद, डॉ. आंबेडकरांची ऐतिहासिक भाषणे व भारतीय संविधानाची निर्मिती - संपादक प्रदीप गायकवाड 

३) भारताची राज्यघटना आणि प्रशासन - रंजन कोळंबे

रविवार, २ जानेवारी, २०२२

भीमा कोरेगाव युद्ध - पेशवाईचा अस्त

 

तुम्ही 'थ्री हण्ड्रेड' हा सिनेमा पाहिला असेल. ह्या हॉलिवूड सिनेमात ३०० लोकांनी हजारो लोकांचा पराभव करताना दाखविला आहे. अर्थात तो पराभव ते ३०० लोक करत नाहीत तर नन्तर येणारे हजारो सैनिक शत्रूचा पराभव करतात. ह्या चित्रपटात त्या ३०० लोकांचा मृत्यू होतो पण शत्रूला ते आपल राज्य जिंकू देत नाहीत. ते राज्याच्या चिंचोळ्या प्रवेशद्वारावरच शत्रूच्या लाखो सैनिकांना अडकवून ठेवतात. मरण पत्करतात पण शत्रूला राज्य जिंकू देत नाहीत. हा चित्रपट ऐतिहासिक सत्य घटनेवर आधारित आहे. पर्शिया व ग्रीस मध्ये इ.स.पू. ४२८ मध्ये झालेल्या या युद्धाला "थर्मोपिलाईचे युद्ध" म्हणतात.


'कर्नल टॉड' यांनी कोरेगावंच्या लढाईचे वर्णन सुद्धा "थर्मोपिलाईची लढाई" अश्या गौरवपूर्ण शब्दात केले आहे.
अस वर्णन या लढाईच करण्यामागच कारण दोन्ही ठिकाणी असणारी समान परिस्थिती आहे.

एका बाजूला दुसऱ्या बाजीरावाच २८००० सैन्य व दुसऱ्या बाजूला ५०० ब्रिटिश सैनिक. दुसऱ्या बाजीरावाने पुणे परत मिळवण्याच्या हेतूने पुणे वर हल्ला केला होता. तेथे असलेल्या कर्नल 'बर' या इंग्रजी अधिकार्याकडे फारसे सैनिक नव्हते त्यामुळे जवळपास शिरूर या ठिकाणी कॅप्टन स्टोटंन याला त्याने मदतीसाठी बोलावले. कॅप्टन स्टोटंन हा ३१ डिसेंबर १८१७ रोजी रात्री पुण्याकडे निघाला. त्याच्याकडे जी बटालियन होती त्या बटालियन मध्ये बहुतांश महार होते. २५ मैलांचा रात्रभर प्रवास केल्यानंतर पहाटे भीमा नदीच्या तीरावर ही बटालियन पोहोचली. तेव्हा पेशव्यांच  प्रचंड सैन्य नदीच्या दुसऱ्या तीरावर होतं. पेशव्याशी लढता यावे म्हणून कॅप्टन स्टोटंनन कोरेगावचा आश्रय घेतला. कॅप्टन स्टोटंन दिसताच पेशव्याने बापू गोखले यास इंग्रजावर हल्ला करण्यास सांगितले. अशा रीतीने १ जानेवारी १८१८ ला सकाळी लढाईला सुरुवात झाली.या लढाईत महार सैनिकांनी मोठ्या हिंमतीने लढून पेशव्यांच्या सैन्याचा उपाशी पोटी व रात्रभर चालून दमलेले असताना सुद्धा पराभव केला.  रात्री ९ वाजता पेशव्यांच्या सैन्याने पळ काढला. या लढाईत इंग्रजांचे २७५सैनिक ठार झाले तर पेशव्यांचे ७००-८०० सैनिक ठार झाले.

या लढाईच्या प्रित्यर्थ इंग्रजांनी भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभ उभारला त्यावर त्या लढाईत जे शहिद झाले त्यांची नावे कोरली आहेत.


ब्रिटीशाचा एक सैनिक तर पेशव्याचे ५६ सैनिक समोरासमोर होते म्हणून तुझ्यासारखे छप्पन पाहिले ही म्हण अस्तित्वात आली असण्याची शक्यता आहे. ज्यांना म्हणी कशा निर्माण होतात हे समजते त्यांना हे पटू शकेल.

पण महार ब्रिटिशांच्या बाजूने का लढले ???

याची कारणे अज्ञात आहेत. कदाचित पोटासाठी लढले असतील. सर्व राजे महाराजे देखील पोटासाठीच लढतात. मग यात काय विशेष.

कदाचित त्यांना इंग्रजी लष्करात देशी लष्करापेक्षा जास्त मान आणि धन सुद्धा मिळाला असावा

तिसरे कारण उत्तर पेशवाईत जातिभेदाच स्तोम खूप माजले होते. महारांवर दुसऱ्या बाजीरावाचा जास्त राग दिसून येतो. याचा प्रभाव या युद्धावर कदाचित पडला असावा.

ब्रिटिशांच्या बाजूने लढण्याचा महारांना काय फायदा झाला ???

ब्रिटिश सैन्यात दाखल झाल्यामुळे महारांना थोडाफार चांगला पगार व मान नक्कीच मिळाला असणार परंतु लवकरच त्यांचा पुढील सर्व युद्धात वापर करून घेतल्या नन्तर त्यांची भरती बंद करण्यात आली. कारण आता उच्चवर्णीय लोक ब्रिटिशांच्या सैन्यात जात होते. त्यामुळे महार अधिकार्याच उच्चवर्णीय सैनिक आदेश पाळणार नाहीत व त्यामुळे सैन्यात अनुशासन राहणार नाही या कारणाने महार सैनिकांची भरती इंग्रजानी बंद केली.

अश्या प्रकारे प्राचीन मध्ययुगीन काळाबरोबर इंग्रजी काळात देखील महारांचा निव्वळ वापर करून फेकून देण्यात आला. आजसुद्धा विविध पक्ष आजच्या बौद्धांचा अशाच प्रकारे वापर करून फेकून देतात हे अजूनही बौद्धांना कळत नाही. हे जेव्हा कळेल तो सुदिन असेल.

आजच्या घडीला या लढाईचे महत्व काय ???

लढणे हा फक्त क्षत्रियांचा विषय आहे ही अंधश्रद्धा गेल्या काही वर्षांत पसरली आहे. क्षत्रिय म्हणजे ज्यांच्याकडे स्वतःच्या मालकीची जमीन होती अश्या लोकांना क्षत्रिय गण म्हणत. जमिनीचे मालक स्वाभाविक राजे होत असत म्हणून क्षत्रिय हा राजा असतो. क्षत्रिय ही व्याख्या लढण्याशी संबंधित नाही. ती राज्य करण्याशी संबंधित आहे. लढण्यासाठी किंवा मरण्यासाठी शूद्र अतिशूद्रांचा वापर होत होता.
भीमा कोरेगाव युद्धातून जातीचा अभिमान मिरवण्यापेक्षा अखिल भारतीय अनुसूचित जाती जमाती व मागासवर्गीय लोकांच्या मनातील न्यूनगंड काढण्यासाठी या लढाईच स्मरण केलं तरी पुरेसे आहे.

येणार युग युद्धाने नव्हे तर बुद्धीने (बुद्धाने) आपल्याला जिंकायचं आहे हे मात्र लक्षात असू द्या. 

महामाया महिषासुरमर्दिनी

सिंधू संस्कृतीत भूमातेला रेडा बळी देण्याची प्रथा   रुक्मिणी मंदिरातील बुद्धमूर्ती नालंदा जवळील जगदिशपूर येथील भूमीस्पर्श बुद्ध मूर्ती चा खाल...